पिंपरी (Pclive7.com):- शहरातील डांगे चौक परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डांगे चौक येथील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये १८ व्या मजल्यावरून पडून आई आणि सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आज (दि. ३० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृत माय-लेकाची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीतून दोन जण खाली पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता एक महिला आणि सहा ते सात वर्षांचा मुलगा गंभीर अवस्थेत आढळून आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला होता.

मृत एकता भांगड आणि त्यांचा मुलगा माधव हे कुटुंब मूळचे राजस्थान येथील असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबात पती, पत्नी आणि मुलगा असे तिघेच राहत होते. महिलेचे पती हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत.

दरम्यान, घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. ही घटना अपघात, आत्महत्या की अन्य काही कारणामुळे घडली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


















Join Our Whatsapp Group