पिंपरी (Pclive7.com):- लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मुग्धा अविनाश देशमुख असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा जुलै २०२५ मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेली होती. ती दररोज आपल्या कुटुंबीयांशी संपर्कात होती. मात्र, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आईशी शेवटचे बोलणे झाल्यानंतर तिचा संपर्क अचानक तुटला. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणीमार्फत चौकशी केली असता, मुग्धाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय उच्चायुक्तांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मुग्धाच्या बँक खात्यांतील व्यवहार तपासले. यावेळी भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगी यांसारख्या ॲप्सवर तिच्या क्रेडिट कार्डचा वापर झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुग्धा भारतातच असल्याचा संशय बळावला. कुटुंबीयांनी छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. यामध्ये मुग्धाचे लोकेशन गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित फ्लॅटची माहिती घेतली. बनावट चावीच्या मदतीने बंद फ्लॅट उघडण्यात आल्यानंतर आत मुग्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेबाबत शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी माहिती दिली. शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच मुग्धाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. सध्या शिरगाव पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लंडनला शिक्षणासाठी गेलेली तरुणी भारतात कधी परतली? ती गहुंजे येथील फ्लॅटमध्ये कशी पोहोचली? तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत.

















Join Our Whatsapp Group