पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यावर झालेल्या लाचप्रकरणाच्या कारवाईवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अधिकारी नगरसेवकांना उत्तरे देत नाहीत, नागरिकांची कामे रखडली आहेत आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये ठोस कारवाई होत नाही, असा घणाघात करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी बोलताना विश्वजीत बारणे म्हणाले की, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई संपूर्ण देशाने पाहिली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहराची मोठी बदनामी झाली आहे. महापालिकेत आतापर्यंत लाचप्रकरणांमध्ये ३६ जण पकडले गेले आहेत. त्यापैकी २७ अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात खटले सुरू असून, चार जणांवरील गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर चार जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
महापालिकेत नेमके चालले तरी काय? प्रत्येक विभागात गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, विविध विभागांमधील भ्रष्टाचार या कारवायांमधून समोर येत आहे. प्रशासनाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन भ्रष्टाचाराला आळा घालवा अशी मागणी बारणे यांनी केली.

विश्वजीत बारणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर इतर नगरसेवकांनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आयुक्त सभागृहात उपस्थित राहून निघून गेल्याने नगरसेवकांनी उभे राहून निषेध नोंदविला. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर या गदारोळानंतर १५ ऑक्टोबर रोजीची तहकूब सर्वसाधारण सभा पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. आता ही सभा २० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.


















Join Our Whatsapp Group