पिंपरी (Pclive7.com):- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आकुर्डी ते पिंपरीदरम्यान आज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मोरवाडी अंडरपासच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने अंडरपाससह दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका बसून सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मोरवाडी अंडरपासखालील स्लॅबचे काही भाग तुटले असून त्यातील खडी आणि सिमेंटचे तुकडे (लूज मटेरियल) अचानक खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तातडीने धोकादायक लूज मटेरियल काढण्याचे काम हाती घेण्यात आले.

मात्र, ऐन गर्दीच्या वेळी हे काम सुरू करण्यात आल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. अंडरपासचा मार्ग आणि सर्व्हिस रोडवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या. अनेक वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम आवश्यक असले, तरी अशा कामांचे नियोजन गर्दीच्या वेळा टाळून करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.


















Join Our Whatsapp Group