महात्मा फुले द्विशताब्दी उत्सव समितीच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, शेतकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांनी आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला असून, आजही त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.

महाराष्ट्र काँग्रेस महात्मा फुले द्विशताब्दी उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि.२६ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते हनुमंत पवार उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी समाजातील अन्याय, असमानता आणि अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षणाचा मार्ग दाखविला. त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात आर्वी येथून झाली असून, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे हजारोंच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, अनिल जयहिंद यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज (बंटी) पाटील यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी सध्याच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आजचे सरकारही ब्रिटिशांप्रमाणे वागत असून, शेतकऱ्यांची परिस्थिती आजही हलाखीची आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे वास्तव महात्मा फुले यांनी समाजासमोर मांडले. पुण्यात जमीनदार आणि सावकारांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व महात्मा फुले यांनी केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची जयंती साजरी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले, असे पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा शिक्षण मंडळाचे सभापती विष्णुपंत नेवाळे यांनी केले. महात्मा फुले उत्सव समितीचे सरचिटणीस सोमनाथ शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. संदेश नवले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हनुमंत माळी, आनंदा कुदळे, अरुण भूमकर, महादेव भुजबळ, संगीता बोराटे आणि अश्विनी सातव डोके यांचा समावेश होता.
याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव तथा ‘शिदोरी’ मासिकाचे संपादक अनंत मोहोड, सरचिटणीस नंदकुमार कुंभार व पांडुरंग कुंभार, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे, महात्मा फुले समितीचे उपाध्यक्ष विजय राऊत व राजीव घुटे, प्रसिद्धीप्रमुख शैलेश राऊत, कोकण विभागीय अध्यक्ष शंभो म्हात्रे, प्रभारी सीमा बुट्टे, माजी नगरसेविका गिरिजादेवी कुदळे, शीतल कोतवाल, किशोर कळसकर, अनिताताई धर्माधिकारी, शहर काँग्रेसचे प्रवक्ते विशाल कसबे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मयूर जैस्वाल यांनी सूत्रसंचालन केले, तर संदेश नवले यांनी आभार मानले.

















Join Our Whatsapp Group