पिंपरी (Pclive7.com):- सांगवी येथील संविधान चौकातील संविधान शिल्प हटविल्याच्या प्रकरणी काँग्रेस आणि समविचारी संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज रविवार, १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय संविधान सन्मान निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

यावेळी बनसोडे म्हणाले की, संविधान चौकात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निश्चित केलेल्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहोत. उद्या या आंदोलनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार असून, संविधान सन्मान निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सांगवी येथील संविधान चौकात ही सभा होणार आहे. या सभेत आंदोलनाचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल. तसेच कायदेशीर लढ्याबाबत सर्वांना सोबत घेऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.

संविधानाचा सन्मान, न्याय आणि नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार असून आंदोलनाची पुढील दिशा सर्वांच्या सहमतीने ठरवून न्यायासाठी अधिक जोमाने लढा देण्यात येणार आहे.या संविधान सन्मान निर्धार सभेला आंबेडकरी चळवळीतील नेते, सर्वपक्षीय नेते, पुरोगामी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, संविधानप्रेमी नागरिक तसेच बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

















Join Our Whatsapp Group