पिंपरी-चिंचवडमधील ८०० हून अधिक आशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ८०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आशा स्वयंसेविकांच्या महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक योगदानाची दखल घेऊन प्रशासनाने दिवाळीपूर्वी हा निर्णय घ्यावा, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माता व बाल आरोग्य, गरोदर महिलांची देखभाल, बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, क्षयरोग व डेंग्यू यांसारख्या आजारांबाबत जनजागृती, घरोघरी आरोग्य सर्वेक्षण तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी या स्वयंसेविका सातत्याने कार्यरत असतात.

अत्यल्प मानधनावर काम करत असतानाही त्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडतात. शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. विशेषतः माता, बालके, गरोदर महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यविषयक सुविधा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्या करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकांच्या कार्याची दखल घेऊन दिवाळीसारख्या आनंदाच्या सणानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनाही आनंद मिळावा, या सामाजिक भावनेतून महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक आशा स्वयंसेविकेला किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

तसेच, या अनुदानासाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक तरतूद करून संबंधित प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी आणि दिवाळीपूर्वी ही रक्कम सर्व पात्र आशा स्वयंसेविकांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, अशी विनंतीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. आशा स्वयंसेविका या शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टाची आणि सेवेची योग्य दखल घेऊन दिवाळीच्या निमित्ताने त्यांना आर्थिक सन्मान मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका संदीप वाघेरे यांनी मांडली आहे.


















Join Our Whatsapp Group