सन्मानजनक ठिकाणी प्रतिमा हलविण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर पुरुष व महिला स्वच्छतागृहांच्या मधल्या भागात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अजितदादा पवार यांचे तैलचित्र अशा ठिकाणी लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सीमा सावळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या लोकनेत्याचे तैलचित्र महापालिकेच्या मुख्य सभागृहात किंवा अन्य सन्मानजनक ठिकाणी लावण्यात यावे, अशी मागणी सीमा सावळे यांनी यापूर्वीच केली होती. मात्र, प्रशासनाने पुरुष आणि महिला स्वच्छतागृहांच्या मधल्या भागात तैलचित्र लावल्याने त्यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एवढ्या मोठ्या लोकनेत्याचे तैलचित्र स्वच्छतागृहाजवळ लावणे ही अत्यंत चुकीची बाब असून, यातून नेत्याचा अवमान होत असल्याची भावना सीमा सावळे यांनी व्यक्त केली. संबंधित तैलचित्र तात्काळ त्या ठिकाणाहून हटवून सन्मानजनक ठिकाणी लावण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर आणि नियोजनावर टीका होत असून, राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. आता प्रशासन हे तैलचित्र अन्य सन्मानजनक ठिकाणी हलविणार की याच जागी ठेवणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group