संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांसाठी ८ हजार रुपयांचे रोख अनुदान मंजूर केल्याचा खोटा संदेश सध्या WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून अनुदान मिळविण्याचे आमिष दाखविले जात असून, नागरिकांनी अशा फसव्या संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

या संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यास नागरिकांची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती चोरली जाण्याची शक्यता आहे. त्यातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अनुदानाच्या आमिषाला बळी पडून कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
१. दिवाळीनिमित्त ८ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याच्या अनोळखी संदेशांवर विश्वास ठेवू नये.
२. WhatsApp किंवा सोशल मीडियावर आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये.
३. अनुदान मिळविण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा पैसे भरू नयेत.
४. अनोळखी वेबसाइटवर वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती भरू नये.
५. ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटची सत्यता आणि अधिकृतता तपासावी.
६. कोणालाही OTP, ATM PIN, CVV किंवा UPI PIN सांगू नये.
७. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये.
८. असे फसवे संदेश इतरांना फॉरवर्ड करू नयेत.
९. सरकारी योजनांची माहिती केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच तपासावी.

फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क साधा!
नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही आकर्षक आमिषाला बळी न पडता सतर्क राहावे आणि सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी केले आहे.


















Join Our Whatsapp Group