पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटे पुरम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मानवी पायाचे दोन तुकडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे सांगवी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मानवी पायाचे तुकडे पुरुषाच्या मृतदेहाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, संबंधित व्यक्ती नेमकी कोण आहे, तसेच हे तुकडे त्या ठिकाणी कोणी आणि कशासाठी आणून टाकले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून परिसराची पाहणी करण्यात येत असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, मानवी पायाचे हे तुकडे कोणाचे आहेत, मृत व्यक्तीची ओळख कशी पटवायची आणि या घटनेमागे नेमके काय रहस्य आहे, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.


















Join Our Whatsapp Group