पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नियमित मानधन घेतल्यानंतरही जे वकील महापालिकेच्या विरोधात खटले लढवत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना दिलेले मानधन परत घेतले जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेच्या पॅनेलवर नियुक्त केलेल्या वकिलांच्या कार्यक्षमतेवर आणि मानधनाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

महापालिकेच्या पॅनेलवर नियुक्त केलेल्या वकिलांनी आतापर्यंत महापालिकेच्या बाजूने किती खटले लढवले आणि त्यापैकी किती खटले यशस्वीरीत्या जिंकले, याचा सविस्तर लेखाजोखा (परफॉर्मन्स रिपोर्ट) प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे. जोपर्यंत या वकिलांच्या कामगिरीची आणि केस लढवण्याच्या भूमिकेची संपूर्ण माहिती समोर येत नाही, तोपर्यंत मानधनाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असल्याचे सभापतींनी सांगितले.

“महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या वकिलांनी आपल्या बाजूने किती खटले लढवले आणि त्यांची कामगिरी काय आहे, याचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. जे वकील महापालिकेकडून मानधन घेत असतानाही आमच्याच विरोधात खटले लढवत आहेत, त्यांना दिलेली रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया केली जाईल. जोपर्यंत यासंदर्भातील सर्व सविस्तर माहिती समोर येत नाही, तोपर्यंत हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असून, यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही.”
– अभिषेक बारणे, सभापती – स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

















Join Our Whatsapp Group