वाकड (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वाकड चौकातील PCMC Primary & High School (Boys and Girls) या शाळेची इमारत जुनी झाली असून, तेथील अपुऱ्या शैक्षणिक सुविधा आणि विविध गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जुन्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीत तातडीने स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका तथा महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्य सौ. श्रुती राम वाकडकर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. जुन्या शाळेच्या इमारतीतील अपुऱ्या सुविधा आणि असुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असून, त्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीमध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे जुन्या इमारतीत विद्यार्थ्यांना ठेवण्याऐवजी त्यांचे नवीन इमारतीत स्थलांतर केल्यास विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेता येईल.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि नवीन शाळेच्या इमारतीतील सुविधांचा त्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी महापालिका प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी केली आहे.

















Join Our Whatsapp Group