पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे भव्य तैलचित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहातील दर्शनी भागात सन्मानपूर्वक लावण्यात यावे, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासाच्या वाटचालीत स्व. अजितदादा पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि नियोजनबद्ध विकासाच्या संकल्पनेमुळे शहराने देशाच्या नकाशावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे नाना काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

शहरातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि विविध विकासकामांना गती देण्यात अजितदादांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. शहराच्या विकासाचा इतिहास लिहिताना त्यांच्या योगदानाचा उल्लेख सुवर्णाक्षरांनी करावा लागेल. त्यांचे कार्य आजच्या पिढीसह भावी पिढ्यांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिकेच्या मुख्य सभागृहात येणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना त्यांच्या कार्यातून सदैव प्रेरणा मिळावी, तसेच शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या नेतृत्वाचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी मुख्य सभागृहाच्या दर्शनी भागात त्यांचे भव्य तैलचित्र लावण्यात यावे, अशी आग्रही मागणी काटे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.


















Join Our Whatsapp Group