पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली-कुदळवाडी परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रविवारी मध्यरात्री २.४९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने गोडाऊनमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत गोडाऊनचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशामक दलाकडून पुढील तपास सुरू आहे.


















Join Our Whatsapp Group