भाऊसाहेब भोईर यांनी स्थापन केलेल्या ‘कलाकार कट्ट्याचा’ वर्धापन दिन उत्साहात
पिंपरी (Pclive7.com):- नाटक, संगीत, कला नसती तर माणूस वेडा झाला असता. याचा प्रत्यय कोविडच्या काळात आपल्याला आला आहे. या कलेचे आपणही काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आणि स्थानिक रंगभूमीला नवे कलाकार व त्यांना संधी मिळावी, शहरातील नाट्य चळवळीला व्यापक व्यासपीठ मिळावे आणि नाना पाटेकर यांच्या या शहरातील स्मृती जागृत राहाव्यात, नाट्यकला समृद्ध व्हावी यासाठी आगामी काळात पिंपरी चिंचवड मध्ये “कै. नाना पाटेकर राज्यस्तरीय स्मृती करंडक अंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा” आयोजित करण्यात येतील. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कै. लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा, अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या पुढील काळात या राज्यस्तरीय स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात येतील अशी घोषणा आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड येथे केली. तसेच जोपर्यंत भाऊसाहेब भोईर आणि मी सक्रिय आहोत तोपर्यंत हा उपक्रम सुरूच राहील अशी काही देखील आ. जगताप यांनी दिली. तसेच उपस्थितांना दिवाळीच्या आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आ. जगताप यांनी आवाहन केले की, सर्व नागरिकांनी स्वच्छते बरोबरच वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा.

गुरूवार, (दि.५ ) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ‘कलाकार कट्टा’ या संस्थेच्या वर्धापन दिन आणि रंगभूमी दिन निमित्त चिंचवड येथील पंडित पद्माकर कुलकर्णी कला मंदिर, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह तळमजला येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात आ. जगताप यांनी ही घोषणा केली. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा उपाध्यक्ष तथा कलाकार कट्ट्याचे संस्थापक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कलाकार कट्ट्याचे सभासद बंधू, भगिनी उपस्थित होते.

यावेळी सुरेश कंक, वृषाली भणगे, ऋतुजा महाजन, गणेश कांबळे, शुभ्रा घायतडक आणि केतन लुंकड यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘नांदी नव्या पर्वाची, शोध प्रतिभेचा जागर कलेचा’ हे घोषवाक्य घेऊन या संस्थेने वर्षभर सादर केलेल्या कार्यक्रमांची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, जीवनातील नैराश्याच्या, अपयशाच्या काळात रंगभूमी जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन देते. पिंपरी चिंचवड शहरात नाट्य चळवळ वाढीस लागावी यासाठी लोकनेते शरद पवार यांनी पाठबळ दिले. तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप तसेच माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे देखील मोठे योगदान आहे. या शहरातील नाट्य परिषदेच्या सभासदांमुळे पिंपरी चिंचवड मध्ये दोन वेळा अखिल भारतीय नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले असे हे देशातील एकमेव उदाहरण आहे. ‘कलाकार कट्टा’ने एका वर्षात विविध कला प्रकारांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम केले आहे. नवोदित कलाकारांपासून अनुभवी कलावंतांपर्यंत सर्वांना आपली कला सादर करण्याची संधी दिली. दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना भाऊसाहेब भोईर यांनी आवाहन केले की, सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मनपा प्रशासनाला सहकार्य करावे.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर तबलावादनाच्या तालसुरांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. नृत्यार्पण ग्रुपच्या कनक देशमुख, वृंदा जोशी, निहारिका शिंदे आणि इशा झा यांनी नृत्य सादर केले. बाल कलाकार श्रीजा उज्जैनकर, अन्वी फटांगरे, वरद फटांगरे, यज्ञा पाटील, व्रिहा काळे, रजत देशमुख आणि शौर्य मुजुमदार यांनी बालनाट्याच्या माध्यमातून रंगमंचावर आपली छाप उमटवली.
शब्दांच्या माध्यमातून भावविश्व उलगडणाऱ्या काव्यवाचन सत्रात सुरेश कंक, संजय गमे आणि राधाबाई वाघमारे यांनी कविता सादर केल्या. स्वर सुधा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थीनी निधी लच्याण, रुजुला बांडे, केशवी धर्माधिकारी, श्रेया त्रिकूटकर, गाथा चव्हाण, उर्वी नाईक, मैथिली कुलकर्णी, अस्मी खामितकर आणि गायत्री कुलकर्णी यांनी गायन सादर करून संगीताची मैफल सजवली.

महाराष्ट्राच्या लोक परंपरेचे दर्शन घडवताना आसाराम कसबे यांनी भारुड सादर केले. दिवंगत ज्येष्ठ लावणी कलावंत मधू कांबीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी शुभ्रा घायतडके यांनी लावणी सादर केली. गणेश कांबळे यांनी शेतकरी आत्महत्या या गंभीर सामाजिक प्रश्नावर आधारित कलाविष्कार सादर केला. सुहास जोशी यांच्या ‘नाटक या विनोदी कथेच्या सादरीकरणाने कार्यक्रमात वेगळी रंगत आणली.
चित्रकलेच्या माध्यमातूनही कलाकारांनी आपली प्रतिभा प्रदर्शित केली. वैशाली गायकवाड आणि रती देशमुख यांच्या चित्रांचे प्रदर्शन रसिकांसाठी खुले करण्यात आले होते. विविध कला माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या या सादरीकरणांनी कलाकार कट्ट्याच्या बहुआयामी स्वरूपाचे दर्शन घडवले. ‘स्व. नाना पाटेकर स्मृती करंडक’ या नाट्यस्पर्धेच्या घोषणेने शहरातील रंगभूमीच्या चळवळीला आणखी एक नवे व्यासपीठ मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनात कलाकार कट्टा नियोजन समिती राजेंद्र बंग, सुहास जोशी, सीमा गांधी, गौरी लोंढे, राज अहेरराव, रवी दामोदरे, संतोष रासने, किरण येवलेकर, अश्विनी कुलकर्णी, प्रकाश ढवळे, आसाराम कसबे आदींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन सीमा गांधी आणि आभार आकाश थिटे यांनी मानले.


















Join Our Whatsapp Group