
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन रस्त्याचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकांकडे याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. नाशिक फाटा ते कोकणे चौक बीआरटीएस रस्ता तसेच कुणाल आयकॉन समोरील डी.पी. रस्ता हे दोन प्रमुख मार्ग असून, हे रस्ते कोकणे चौक व शिवर चौक येथे एकत्र येतात. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

या समस्येवर उपाय म्हणून पिके चौक ते कुंजीर चौक दरम्यान, संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या जगताप डेअरी बीआरटीएस रोडजवळ ‘वाय’ जंक्शन स्वरूपात नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रस्तावाचा समावेश नवीन विकास आराखड्यात (डीपी) करण्यात यावा, अशी मागणी ही नगरसेविका अनिता संदीप काटे यांच्यासह नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका कुंदा भिसे यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group