पिंपरी (Pclive7.com):- स्वेच्छानिवृती घेतलेले पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील सर्व विकासकामे, निविदा प्रक्रिया आणि देयकांची सखोल चौकशी करावी अशी मागणी नगरसेवक विनोद नढे यांनी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. तसेच निकम यांच्या कार्यकाळातील सर्व निविदा प्रक्रियेत माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील नगरसेवक नढे यांनी केली आहे.

विनोद नढे यांनी महापालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, मी या महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी/नगरसेवक म्हणून आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, मकरंद निकम यांनी शहर अभियंता (City Engineer) या पदावर कार्यरत असताना घेतलेले अनेक तांत्रिक निर्णय आणि राबवलेल्या निविदा प्रक्रिया संशयास्पद वाटत आहेत. सार्वजनिक निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला आहे की नाही, याची खात्री करणे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे.

मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृती (VRS) घेतली असली, तरी महाराष्ट्र नागरी सेवा (पेंशन) नियम, १९८२ नुसार त्यांच्या कार्यकाळातील अनियमिततेची चौकशी करण्याचा अधिकार प्रशासनास आहे. त्याअनुषंगाने, खालील कामांची सविस्तर माहिती व कागदपत्रे मला १५ दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्यात यावीत.

१. निविदा प्रक्रिया (Tenders): निकम यांच्या कार्यकाळात शहर अभियंता म्हणून मंजूर करण्यात आलेल्या सर्व लहान-मोठ्या निविदांची यादी, त्यातील अटी-शर्ती आणि मंजूर दर (Rate Approval).
२. देयके (Bills): संबंधित कामांसाठी कंत्राटदारांना अदा करण्यात आलेल्या रक्कमेचा तपशील (Measurement Books & Payment Vouchers).
3. थर्ड पार्टी ऑडिटः त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट झाले असल्यास त्याचे अहवाल.
४. विशेष अधिकारः त्यांनी त्यांच्या स्तरावर ‘आणीबाणीच्या कामां’च्या नावाखाली (Emergency Works) कोणत्याही निविदेविना मंजूर केलेल्या कामांचा तपशील.
५. तांत्रिक मंजुरी (Technical Sanction): रस्ते, उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा विभागांतर्गत ज्या कामांना त्यांनी तांत्रिक मंजुरी दिली, त्या कामांची सद्यस्थिती.

माहिती न मिळाल्यास जनहित याचिका दाखल करणार..
सदर माहिती उपलब्ध करून न दिल्यास किंवा त्यात अनियमितता आढळल्यास, उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा विनोद नढे यांनी दिला आहे.



















Join Our Whatsapp Group