पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी परिसरात अडीच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी विजय भोसले याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विनोद नढे यांनी केली आहे.

या संदर्भात विनोद नढे यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक असून, या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही खालील मागण्या करत आहोत.

निवेदनामध्ये करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या..
या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी.
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला तातडीने न्याय मिळवून द्यावा.
विशेष सरकारी वकील नियुक्त करून आरोपीला कोणतीही कायदेशीर पळवाट मिळू नये.

नगरसेवक विनोद नढे यांनी प्रशासनाला आवाहन करत म्हटले आहे की, या प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होईल. दरम्यान, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



















Join Our Whatsapp Group