पिंपरी (Pclive7.com):- मोशी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वॉचमन दिनेश बाबूराम चौधरी (वय २४) याला पिंपरी येथील विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवले. जिल्हा न्यायाधीश-३ तथा विशेष न्यायाधीश संजय एन. यादव यांनी शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी हा निकाल देत त्याला जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या साडेपाच महिन्यांत खटल्याचा निकाल लागला आहे.

आरोपीबाबत सहानुभूती नाहीच…!
न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) अन्वये २ वर्षे, पोक्सो कलम ८ अन्वये ३ वर्षे, कलम १० (गंभीर लैंगिक अत्याचार) अन्वये ५ वर्षे आणि कलम १२ अन्वये २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. प्रत्येक कलमाखाली २ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला; दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या असल्याने प्रत्यक्षात आरोपीला पाच वर्षांचा कारावास भोगावा लागेल. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील एस. एम. चौगुले यांनी गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता जन्मठेपेची मागणी केली. बचावपक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी आरोपीवर आधी कोणताही गुन्हा नसल्याचा मुद्दा मांडून सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती केली. मात्र, पीडित मुली १२ वर्षांखालील असल्याने आरोपी कोणत्याही सवलतीस पात्र नाही, अशा गुन्ह्यांत शिक्षा प्रतिबंधक असणे आवश्यक आहे, असे नमूद करून न्यायालयाने सवलत नाकारली.
“लहान मुलींवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या वॉचमनवर सोसायटीतील कुटुंबांनी विश्वास ठेवला, त्यानेच असे कृत्य करणे अत्यंत संतापजनक आहे. न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने अशा प्रवृत्तींना जरब बसेल. अवघ्या साडेपाच महिन्यांत निकाल लागल्याने पीडित कुटुंबांना न्याय मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि न्यायालयाचे मनापासून आभार. सोसायटींनी सुरक्षारक्षकांची पार्श्वभूमी तपासूनच नेमणूक करावी आणि मुलांच्या सुरक्षेबाबत सजग राहावे, असे आवाहन या निमित्ताने करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


















Join Our Whatsapp Group