पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित पट्ट्याचे संरक्षण करण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड व पुनर्रोपणाच्या निर्णयाला नगरसेवक अमित गावडे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. विकासकामे आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जुन्या व पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची कत्तल करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे त्यांनी लेखी हरकत व आक्षेप नोंदविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत २० नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील कलम ८ (३) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर नोटीसच्या अनुषंगाने गावडे यांनी ही हरकत नोंदविली आहे.
शहराचे झपाट्याने नागरीकरण होत असताना प्रदूषण, वाढते तापमान आणि पर्यावरणाचा बिघडता समतोल या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत जुने आणि पूर्ण वाढ झालेले वृक्ष हे शहराचे फुफ्फुस असून, त्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध बांधकामे, रस्ते विकास आणि अन्य प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड किंवा पुनर्रोपणाचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणे शहराच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते, असे गावडे यांनी हरकतीत नमूद केले आहे.
कोणत्याही विकासकामाचा आराखडा तयार करताना अस्तित्वातील वृक्ष वाचविण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पर्याय तपासणे आवश्यक आहे. किरकोळ आराखडा बदल करून वृक्ष वाचविणे शक्य असल्यास सरसकट वृक्षतोडीला परवानगी देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
तसेच, वृक्ष पुनर्रोपणाचा पर्याय अनेक प्रस्तावांमध्ये सुचविला जात असला, तरी यापूर्वी शहरात पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. योग्य तांत्रिक देखभाल आणि निगा न राखल्यामुळे पुनर्रोपित वृक्ष सुकून जातात. त्यामुळे पुनर्रोपणाऐवजी संबंधित ठिकाणीच वृक्षांचे जतन करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित वृक्षतोडीतील प्रत्येक वृक्षाची पर्यावरण तज्ज्ञ, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर संयुक्त पाहणी करावी. बाधित होणाऱ्या वृक्षांची संख्या, त्यांचे वय, प्रजाती तसेच संबंधित प्रकल्पाची आवश्यकता यांचा सविस्तर तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणीही गावडे यांनी केली आहे.
शहराचे पर्यावरण अबाधित राखणे आणि भावी पिढ्यांना निरोगी वातावरण उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे अनावश्यक वृक्षतोड आणि पुनर्रोपणास परवानगी नाकारावी, अशी ठाम मागणी नगरसेवक अमित गावडे यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group