वाकड (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २६ मधील वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या RMC प्लांटमुळे निर्माण होणारे धूळ, ध्वनी आणि वायुप्रदूषण तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) केलेल्या तक्रारीनंतर संबंधित प्लांटची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

MPCB च्या फील्ड ऑफिसर सीमा साळवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणीदरम्यान प्लांटमधून निर्माण होणारी धूळ, ध्वनी व वायुप्रदूषण तसेच डंपर, RMC बल्कर आणि इतर अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पार्क स्ट्रीट सोसायटीच्या ॲपेक्स कमिटीचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये सुमारे १२ हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ प्रदूषणापुरता मर्यादित नसून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे. यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी नागरिकांनी मोर्चा काढून या समस्येविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी MPCB कडे लेखी निवेदन देत RMC प्लांटच्या परवानग्या, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
निवासी परिसर आणि शाळेच्या जवळ सुरू असलेल्या या प्लांटच्या वैध परवानग्या, पर्यावरणीय नियमांचे पालन तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करावी. तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्लांटचे कामकाज बंद करण्यासह संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीवर योग्य निर्बंध घालावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी केली आहे.

















Join Our Whatsapp Group