बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या अनिल काची आणि अजय कांबळे यांचा पोलीस उपआयुक्तांच्या हस्ते सत्कार
पिंपरी (Pclive7.com):- निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालिकेचा दापोडी परिसरात सुखरूप शोध लागला. दोन सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बालिकेला सुरक्षितपणे दापोडी पोलीस ठाण्यात आणून दिल्याने तिला पोलिसांपर्यंत पोहोचविण्यात मोठी मदत झाली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अनिल शिवाजी काची आणि अजय कांबळे यांचा पोलीस उपआयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय कु. सौजन्या चलवत्रा पुजारी या बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून बालिकेचा शोध सुरू होता.
दरम्यान, दापोडी येथील विसावा परिसरात अनिल शिवाजी काची (व्यवसाय इलेक्ट्रिकल शॉप, रा. काची चाळ, दापोडी) आणि अजय गोरख कांबळे (वय ४०, व्यवसाय चालक, रा. दापोडी) यांना ही बालिका एकटीच खेळताना आढळली. त्यांनी बालिकेकडे तिच्या घराबाबत आणि पालकांबाबत विचारपूस केली. मात्र, बालिकेला केवळ कन्नड भाषा येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अशा परिस्थितीतही दोघांनी प्रसंगावधान राखत बालिकेला सुरक्षितपणे दापोडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेमुळे बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, संदीप आटोळे यांच्या हस्ते दापोडी पोलीस ठाण्यात अनिल काची आणि अजय कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
लहान मुले एकटी किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास दुर्लक्ष करू नका!
आपल्या परिसरात एखादे लहान मूल एकटे किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांना मिळणारे सहकार्य समाजातील सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवाहन केले आहे.

















Join Our Whatsapp Group