माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी-काळेवाडी परिसरातील रस्त्यांची आरक्षणे तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.

रहाटणी-काळेवाडी परिसरातील काही रस्त्यांच्या आरक्षणाचा मोबदला घेऊनही संबंधित जागा अडविण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या आरक्षित जागा अडविल्यामुळे काळेवाडीतून पिंपरीकडे जाण्यासाठी नागरिकांना लांबचा वळसा घालावा लागत आहे. तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी महापालिकेने आरक्षित केलेल्या जागाही अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे परिसराचा विकास रखडल्याचे तापकीर यांनी निवेदनात म्हटले आहे.
तापकीर मळा ते पिंपरीगाव पूल, लकी बेकरी ते पिंपरीगाव तसेच राजवाडेनगर ते पिंपरी पूल या मार्गांवरील रस्त्यांचा भाग विकसित केल्यास पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प आणि काळेवाडीतील नागरिकांना एम्पायर इस्टेट पुलाकडे जाणे अधिक सोयीचे होईल. त्याचबरोबर रहाटणी-काळेवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचाही विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
परिसरातील १२ मीटर, ९ मीटर आणि ६ मीटर रुंदीच्या रस्त्यांची आरक्षित जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी. यासाठी ज्या नागरिकांच्या जमिनी बाधित होतील, त्यांना जमिनीच्या बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वाकड, रावेत, पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या भागांप्रमाणे रहाटणी-काळेवाडी परिसरातील रस्त्यांचे नियोजनबद्ध पद्धतीने रुंदीकरण आणि विकास झाल्यास नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा मिळेल. वाहतुकीचा त्रास कमी होण्याबरोबरच परिसर स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यास मदत होईल. चांगल्या रस्त्यांमुळे परिसरातील जमिनींच्या मूल्यामध्येही वाढ होऊ शकते, असे तापकीर यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांची तसेच सार्वजनिक हिताच्या सुविधांसाठी राखीव असलेल्या जागांची मालकी महापालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने रहाटणी-काळेवाडी परिसराचा विकास खुंटत असून परिसराची अवस्था बकाल होत चालली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व आरक्षित जागा तातडीने ताब्यात घ्याव्यात आणि विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group