वाकड (Pclive7.com):- पार्क स्ट्रीट सोसायटी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नियमबाह्य बांधकामे, RMC प्लांटला दिलेली परवानगी आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीविरोधात नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे आक्रमक झाल्या आहेत. नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित मोर्चात सहभागी होत त्यांनी रहिवाशांना ठाम पाठिंबा दिला. तसेच, या प्रश्नांवर महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

पार्क स्ट्रीट सोसायटी परिसरात सुमारे १२ हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या परिसरात ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. असे असताना सोसायटीसमोरच शाळा असलेल्या परिसरात RMC प्लांटला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय, स्वतंत्र अस्तित्व असलेल्या पार्क स्ट्रीट सोसायटीच्या कंपाउंड वॉलचा काही भाग पाडून शेजारील नवीन सोसायटीच्या बांधकामासाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. हे काम कोणत्या परवानगीने करण्यात येत आहे, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली.
सोसायटीच्या मुख्य रस्त्यावरून डंपर, RMC मिक्सर आणि बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची सातत्याने वाहतूक सुरू आहे. याच रस्त्यावरून शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांची ये-जा होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित करत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तातडीने निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली.
या सर्व प्रश्नांबाबत नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी वेळ निश्चित केली आहे. सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेऊन RMC प्लांटची परवानगी, कंपाउंड वॉल पाडण्यासंदर्भातील परवानग्या, नियमबाह्य बांधकामे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न मांडण्यात येणार आहे. तसेच संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.
यावेळी नगरसेविका स्नेहा कलाटे म्हणाल्या, “पार्क स्ट्रीट सोसायटीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाच्या सोयीपेक्षा नागरिकांचे जीवन आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होईपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील. गरज पडल्यास नागरिकांसह पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
या मोर्चामध्ये सोसायटीच्या अपेक्स कमिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्या हक्कांसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी यावेळी व्यक्त केली.


















Join Our Whatsapp Group