पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला स्वच्छतेसाठी मिळालेल्या पुरस्काराबद्दल स्वच्छता आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतानाच, शहरातील सध्याच्या कचरा व्यवस्थापनाच्या परिस्थितीवर महापालिका प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत नगरसेवक राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज (२० नोव्हेंबर) आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी राहुल कलाटे म्हणाले की, “पुरस्कारासाठी स्वतःची पाठ थोपटून घेताना शहरातील सध्याच्या कचऱ्याच्या परिस्थितीची जबाबदारीही स्वीकारावी लागेल. आजही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झालेला नाही. या प्रकल्पाशी संबंधित भागातील नगरसेवक आंदोलन करत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. आमच्याकडे नवीन क्षेत्रीय कार्यालय देण्यात आले आहे; मात्र कचरा संकलनासाठी आवश्यक गाड्या आणि कर्मचारी अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. यासंदर्भात मी स्वतः महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आणू नका. कचरा व्यवस्थापनाचा विचार करताना संपूर्ण शहराचा विचार करूनच निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.”
शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न केवळ पुरस्कार किंवा एखाद्या विभागाच्या कामगिरीपुरता मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्याने निर्माण झालेल्या क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि साधनसामग्री उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ कार्यालयांची निर्मिती करून चालणार नाही, तर त्यांना प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक सुविधा देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असेही राहुल कलाटे यांनी नमूद केले.
यासोबतच स्वच्छता आणि आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा आणि बोनसचा मुद्दाही राहुल कलाटे यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले, “स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन! मात्र, ज्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे शहर स्वच्छ राहते, त्याच कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत पगार आणि बोनस मिळालेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हे कंत्राटी कामगार असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांच्या मेहनतीचा आणि परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने त्यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक भूमिका घ्यावी.” अशी भूमिका कलाटे यांनी मांडली.

नवीन क्षेत्रीय कार्यालये सक्षम करा..
नव्याने क्षेत्रीय कार्यालये करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही यंत्रसामग्री, वाहने, मनुष्यबळ यांची कार्यवाही करण्यात आलेले नाही. त्यानंतर निधीचा प्रश्नही गंभीर आहे. त्यामुळं यावर तत्काळ कार्यवाही होऊन नागरिकांना सुविधा देण्यात याव्यात. याची गांभीर्याने दखल प्रशासनाने घ्यावी नाही तर आम्हालाही आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
– राहुल कलाटे,
नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका


















Join Our Whatsapp Group