पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) सेंट्रल मेडिकल स्टोअरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ७२ लाख रुपये बाजारमूल्य असलेला ॲलोपॅथिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या औषधांमध्ये निकृष्ट दर्जाची तसेच विनापरवाना उत्पादित औषधांचा समावेश असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत केअरझिंक, केअरगिल-२००, एलडीएलआर-५ आणि डोम्पेरिडोन यांसह काही औषधांच्या दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. तसेच काही औषधांच्या पॅकिंगवर केवळ शासकीय पुरवठ्यासाठी असा उल्लेख असतानाही ती औषधे निकृष्ट दर्जाची आणि विनापरवाना उत्पादित असल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, औषधांच्या गुणवत्तेबाबत आधीच संशय निर्माण झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतःहून अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळवले होते. त्यानंतर FDA ने तपासणी करून औषधसाठ्याच्या गुणवत्तेची पडताळणी केली. तपासणी अहवालानंतर प्रशासनाने संबंधित औषधसाठा जप्त करण्याची कारवाई केली.

या प्रकरणात औषधांचा पुरवठा करणाऱ्या मे. श्री विनायक फार्मा कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर जेजुरी येथील औषध उत्पादक कंपनी मे. इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च सेंटरला ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने या कारवाईची माहिती दिली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी आढळल्याने रुग्णांच्या आरोग्यसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासणी आणि खरेदी प्रक्रियेवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

















Join Our Whatsapp Group