पिंपरी (Pclive7.com):- लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार सोहळ्यात संजोग वाघेरे-पाटील यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार तर बाळासाहेब वाघेरे-पाटील यांना ‘समाजभूषण’ जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार असून, शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

संजोग वाघेरे-पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर बाळासाहेब वाघेरे-पाटील हे पिंपरी येथील शुभम उद्योगचे प्रोपायटर असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तिमत्त्वांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार असल्याने या पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस असणार आहेत. मा. रविकांत लोंढे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. अशोककुमार पगारिया आणि डॉ. आनंदा कांबळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी करणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख आणि प्राचार्य डॉ. भीम गायकरवाड यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच डॉ. शिवाजी थिटे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती स्नेहबंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
लोकशिक्षक बाबा भारती यांनी पालि-मराठी भाषेतील पहिला शब्दकोश तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या स्मृती आणि कार्याचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा प्रसार नव्या पिढीपर्यंत व्हावा, या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समिती कार्यरत असून, यामध्ये निमिष भारती, शार्दूल भारती, जय भारती, मारुती सोलंकर, विजय कांबळे, अमोल ढोले, प्रशांत दीक्षित, अनिकेत गाडे, आर. के. कांबळे, आप्पा देशमुख, हंबीरराव पाटील आणि अभिजीत भोसले यांचा समावेश आहे.
लोकशिक्षक बाबा भारती यांच्या कार्याचा गौरव आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान अशा दुहेरी उद्देशाने आयोजित हा सोहळा पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

















Join Our Whatsapp Group