पिंपरी (Pclive7.com):- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पत्रकार परिषदेत फाडल्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. १९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मनसेच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांच्या प्रतिमेचे फोटो फाडून निषेध व्यक्त करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि मराठी माणसाच्या भावनांचे प्रतीक आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचा फोटो जाहीरपणे फाडण्याचे कृत्य निषेधार्ह आहे. त्यानंतर सारवासारव करणे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे. बाळासाहेबांचा अपमान मनसे कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यावेळी मनसेने तीन प्रमुख मागण्या केल्या. शायना एन.सी. यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी, शिंदे गटाने त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांना मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर, महिला अध्यक्ष सीमा बेलापुरकर, राजू सावळे, बाळा दानवले, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरसे, नारायण पठारे, विक्रम भोसले, विष्णू चावरिया, आकाश सागरे, दत्तात्रय डांगे, शिवम महाराणा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

















Join Our Whatsapp Group