पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत थेट व नियमित PMPML बससेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव हा परिसर झपाट्याने विकसित होत असून या भागातील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या परिसरातून दररोज हजारो नागरिक, विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी व कामानिमित्त ये-जा करतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांना प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव येथून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी थेट व नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहने, दुचाकी किंवा अन्य पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढत असून नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत आहे.
विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित, नियमित आणि वेळेत प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रहाटणी-पिंपळे सौदागर-पिंपळे गुरव ते वाकड मेट्रो स्टेशन असा थेट बसमार्ग सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

या बससेवेमुळे नागरिकांना मेट्रो स्टेशनपर्यंत सहज पोहोचता येईल. खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल. तसेच आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल.
त्यामुळे PMPML प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांमार्फत या मार्गाची तातडीने पाहणी करावी, प्रवासी संख्येचे सर्वेक्षण करावे आणि कार्यालयीन वेळेतील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा वारंवारतेने बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे यांनी केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.


















Join Our Whatsapp Group