प्रस्तावित नियुक्ती रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या उदय जरांडे यांची सह आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी तीव्र हरकत घेतली आहे. या नियुक्तीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या २० नोव्हेंबर २०२६ रोजीच्या ठराव क्रमांक ६ अन्वये संबंधित नियुक्तीचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याचे काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे.

सह आयुक्तपद हे महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे प्रशासकीय पद आहे. या पदावर नियुक्ती करताना संबंधित अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता, प्रशासकीय अनुभव, सेवाज्येष्ठता, संवर्ग आणि पदोन्नतीचे निकष तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या जरांडे यांची सह आयुक्तपदी नियुक्ती कोणत्या सेवा नियमांनुसार आणि प्रशासकीय निकषांच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

प्रस्तावित नियुक्तीची प्रचलित सेवा नियम, शासन निर्णय आणि प्रशासकीय तरतुदींनुसार सखोल पडताळणी करावी. संबंधित अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता, प्रशासकीय अनुभव आणि सेवाविषयक कागदपत्रांची सक्षम स्तरावर तपासणी करावी. नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखून त्यामागील प्रशासकीय कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या निवेदनातील हरकतींची दखल घेऊन नियमानुसार निर्णय होईपर्यंत प्रस्तावित नियुक्तीला अंतिम मंजुरी देऊ नये. सखोल पडताळणीत नियुक्ती सेवा नियम किंवा पात्रतेच्या निकषांशी विसंगत असल्याचे आढळल्यास नियुक्तीचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी ठाम भूमिका सचिन काळभोर यांनी मांडली आहे.
महापालिकेतील महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरील नियुक्त्या या केवळ नियम, पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारेच झाल्या पाहिजेत. प्रशासनात पारदर्शकता आणि नियमपालनाला सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणी आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही करून त्याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group