पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त चिंचवडमध्ये काँग्रेसतर्फे विशेष व्याख्यानमाला संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. चिंचवडगाव येथील कै. आनंदीबाई डोके सांस्कृतिक सभागृहात शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) सकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या व्याख्यानमालेत ‘नेहरू काळ – भारताचे सर्वांगीण विकास पर्व’ या विषयावर निश्चय साक्षात साधना सर यांनी, तर ‘निवडणुका, नेहरू आणि न्यू मीडिया’ या विषयावर राजकीय-सामाजिक विषयांच्या अभ्यासक, लेखिका व पत्रकार सोनाली शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने बोलते होणे गरजेचे – सोनाली शिंदे
जेन-झी आंदोलनाने लोकांच्या मनातील व्यक्त होण्याची भीती दूर करून त्यांना आपले मत मांडण्याची वाट मोकळी करून दिली आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने बोलते होण्याची गरज आहे, असे मत सोनाली शिंदे यांनी व्यक्त केले. देशातील अंतिम सत्ता ही जनतेचीच राहण्यासाठी प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने प्रयत्न करणे, हीच पंडित जवाहरलाल नेहरू यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

नेहरूंच्या कार्याची तथ्याधारित माहिती तरुणांपर्यंत पोहोचवणे गरजेचे..
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशात लोकशाही व्यवस्था आणि लोकशाही मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. शेती, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या पायाभूत विकासाचा पाया नेहरूंनी घातला. जागतिक कीर्तीच्या शैक्षणिक व संशोधन संस्था उभारल्या. विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवण्यासाठी विविधतेतील एकता, सर्वांना समान स्थान आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. नेहरूंच्या कार्याविषयीची इतिहासाधारित आणि तथ्यपूर्ण माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे, असे निश्चय साक्षात साधना सर यांनी सांगितले.

नेहरूंचे विचार, लोकशाही मूल्ये आणि आधुनिक भारताच्या विकासाचा प्रवास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमात नितीन गवई आणि अमोल डहाळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहिदुले, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, स्वराज इंडिया अभियानचे प्रदीप पवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शशी बावनकर, काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप शिंदे, मंगेश चव्हाण, सूरज माने, सरचिटणीस अनिता सावळे, अनिता सोनवणे, मीरा बावनकर, नबिल मुल्ला, विल्यम साळवी, हरीश डोळस, विलास सकट, हिराचंद जाधव, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष कुणाल भोसले, निखिल भोईर, युनूस बागवान, कृष्णा जाधव, गौरी नरसिंगे, प्रदीप शर्मा, रामकिसन माने, चिंतामणी सोंडकर, भास्कर नारखेडे, पुरुषोत्तम राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group