देशभरातील खेळाडूंचा सहभाग; राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील योगा उद्यानातील क्लायम्बिंग वॉलवर आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिप २०२६ या स्पर्धेचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी नगरसदस्य शत्रुघ्न बाप्पू काटे, नाना काटे, अनिता काटे, कुंदा भिसे तसेच देवांग नाईक, के. सरस्वती, श्रीकृष्ण कडुस्कर यांच्यासह देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेले खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी प्रेक्षक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र क्लायम्बिंग असोसिएशन आणि इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागांतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून, त्यांना आपल्या कौशल्याचे आणि क्रीडा नैपुण्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे शहराची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यास मदत होते, तसेच स्थानिक खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळते. पिंपळे सौदागर येथील जागतिक दर्जाच्या क्लायम्बिंग वॉलमुळे भविष्यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीही निश्चितच पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना देणे, उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी महापालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनातून शहराच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळेल.


















Join Our Whatsapp Group