पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला दिघी पोलिसांनी पकडले आहे. आरोपीकडून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. कृष्णा सतीश घाडगे (वय २१, रा. नारायण नगर, खंडोबा माळ, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ११ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दगड, शस्त्रे, तलवारी, भाले, लाठ्या, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू जवळ बाळगण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

मात्र, १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकातून वाळके मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी कृष्णा घाडगे हा या आदेशाचे उल्लंघन करून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक काडतूस विनापरवाना बेकायदेशीररीत्या जवळ बाळगताना आढळून आला.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुधीर हरिश्चंद्र डोळस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.


















Join Our Whatsapp Group