पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील घड्याळाच्या दुकानाचे छताचे पत्रे उचकटून आणि पीओपी फोडून महागडी घड्याळे चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. अमिर शब्बीर शेख आणि इरफान हमीद मुलानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून टायटन, फास्टट्रॅकसह विविध नामांकित कंपन्यांची १०८ महागडी घड्याळे, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ९ लाख ८४ हजार ७७० रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.

थेरगाव येथील डांगे चौकाजवळ असलेल्या ‘लाले चष्मेवाले अँड वॉचेस’ या दुकानात दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून आणि पीओपी फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सुमारे ८ लाख २३ हजार ७०१ रुपये किमतीची महागडी घड्याळे आणि डीव्हीआर मशीन चोरी करून पोबारा केला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुकानातील सीसीटीव्ही डीव्हीआरच चोरट्यांनी चोरून नेल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, वाकड पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील तब्बल १५० ते २०० सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरट्यांचा माग काढत पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

चोरीची घड्याळे विक्री करण्यासाठी संशयित आरोपी काळाखडक, वाकड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दि. १० नोव्हेंबर रोजी अमिर शब्बीर शेख (वय २८) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार इरफान हमीद मुलानी (वय २१) याच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी इरफान यालाही अटक केली.
आरोपींकडून टायटन, टायटन रागा, टायटन एज, फास्टट्रॅक आदी कंपन्यांची १०८ घड्याळे (किंमत ९ लाख ४ हजार ७७० रुपये), ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा दुचाकी आणि ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ९ लाख ८४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि त्यांच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.


















Join Our Whatsapp Group