धूळ नियंत्रणासाठी कोट्यवधींची यंत्रणा उपलब्ध; मात्र रस्त्यांवर डस्ट सेपरेशन आणि रोड वॉशर वाहने गायब
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून, शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) २०२ वर पोहोचला आहे. त्यातच पीएम २.५ (PM2.5) या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने विविध आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, सध्या कामाची मुदत संपल्यामुळे डस्ट सेपरेशन व्हेईकल आणि रोड वॉशर व्हेईकल रस्त्यांवर दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी उभारलेली यंत्रणा प्रत्यक्षात वापरात आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी डस्ट सेपरेशन व्हेईकल, रोड वॉशर व्हेईकल तसेच एअर प्युरिफायर सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या यंत्रणांचा नियमित आणि प्रभावी वापर केल्यास रस्त्यांवरील धूळ तसेच हवेत उडणाऱ्या धूलिकणांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होऊ शकते.

एसटीपीच्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर..
या वाहनांमध्ये महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (STP) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जातो. डस्ट सेपरेशन व्हेईकलवरील फॉगिंग यंत्रणेद्वारे पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब हवेत फवारले जातात. या थेंबांच्या संपर्कात आल्याने हवेतील धूलिकण खाली बसण्यास मदत होते. परिणामी हवेत उडणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी करण्यास हातभार लागतो.
तर रोड वॉशर व्हेईकलच्या माध्यमातून रस्त्यांवरील साचलेली धूळ आणि माती पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ केली जाते. त्यामुळे वाहनांच्या वर्दळीमुळे पुन्हा हवेत उडणाऱ्या धूलिकणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

करोडोंची यंत्रणा असूनही वापर का नाही?
एकीकडे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना, दुसरीकडे कामाची मुदत संपल्यामुळे ही वाहने रस्त्यांवरून गायब झाल्याचे चित्र आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी अशा वाहनांची सर्वाधिक आवश्यकता असताना त्यांचा वापर बंद असणे ही चिंतेची बाब आहे.
महापालिका प्रशासनाने या वाहनांच्या कामाची मुदत तातडीने वाढवावी किंवा नवीन निविदा प्रक्रिया राबवून ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीची ठिकाणे, बांधकाम परिसर आणि धुळीचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये या वाहनांचे नियमित नियोजन करणे आवश्यक आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केवळ यंत्रणा खरेदी करून चालणार नाही, तर त्यांचा नियमित वापर आणि प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा प्रदूषण नियंत्रणासाठी केलेली गुंतवणूक केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group