पिंपरी (Pclive7.com):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक शाळा प्रवेश दिनानिमित्त, म्हणजेच विद्यार्थी दिनाच्या औचित्याने रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने पिंपरी येथील भीमसृष्टी स्मारकात विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षण, समता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय धम्मराज साळवे सर, प्रभारी अध्यक्ष प्रा. विक्रांत शेळके, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मयूर जगताप आणि प्रदेश संपर्कप्रमुख अतुल वाघमारे उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “महाराष्ट्र शासनाने २०१७ पासून ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला असला, तरी शासनाच्या वतीने या दिवसाचे महत्त्व गांभीर्याने घेतले जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राजकीय वापर केला जातो; मात्र त्यांच्या शैक्षणिक विचारांचा प्रसार आणि विद्यार्थी दिनाचा व्यापक शासकीय स्तरावर सन्मान होताना दिसत नाही.”

“विद्यार्थी दिन केवळ शासन निर्णयापुरता मर्यादित न राहता, राज्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात तो प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे,” असे मत धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले. रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने विद्यार्थी दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला.


















Join Our Whatsapp Group