पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील साई मारीगोल्ड सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस प्रशासन आणि माजी विरोधी पक्ष नेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नना काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे.

सोसायटीचे सभासद विनोद पाटील यांनी या घटनेची माहिती फोनद्वारे दिल्यानंतर अग्निशामक विभागाला तातडीने पाचारण करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते उमेश काटे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नाना काटे यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी सोसायटीच्या इमारतीतील अनेक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी केले आहे.



















Join Our Whatsapp Group