नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात
रहाटणी (Pclive7.com):- जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अपंगत्वावर मात करत रहाटणी येथील श्रवणदिव्यांग टेबल टेनिसपटू कु. आदर्शा सचिन निकम हिने राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे रहाटणी-तापकीर नगर परिसरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे, केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठीही तिची निवड झाली आहे.

आदर्शाने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीत आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी तिला आर्थिक मदतीचा हात दिला.

आदर्शासारख्या जिद्दी आणि गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्या स्वप्नांना बळ देणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अपंगत्वावर मात करून क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या आदर्शाची कामगिरी इतरांसाठीही प्रेरणादायी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रीय स्पर्धेतही आदर्शाने चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक पटकवावे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक उंचवावा, अशा शुभेच्छा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी दिल्या.


















Join Our Whatsapp Group