आळंदी (Pclive7.com):- अनधिकृत बाईक टॅक्सींचा वाढता सुळसुळाट, ऑनलाइन ॲप आधारित कंपन्यांची मनमानी आणि ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील चालक संघटना एकवटणार आहेत. यासाठी रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आळंदी देवाची येथे राज्यव्यापी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली.

आळंदी येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर ही बैठक होणार आहे. राज्यातील विविध ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कायदेशीर सल्लागार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात विनापरवाना बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. तसेच ऑनलाइन ॲप आधारित कंपन्यांकडून मनमानी भाडे धोरण राबविले जात असल्याने चालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. दुसरीकडे, शासनाने घोषित केलेले ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालक कल्याणकारी महामंडळ अद्याप प्रत्यक्षात कार्यान्वित झालेले नाही. या सर्व प्रश्नांवर एकत्रित लढा उभारण्याची भूमिका संघटनांनी घेतली आहे.

या बैठकीत अनधिकृत बाईक टॅक्सीवर बंदी घालून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करणे, ऑनलाइन ॲप कंपन्यांच्या भाडे धोरणावर नियंत्रण आणणे आणि चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची तातडीने स्थापना करून त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणे, या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे.
याशिवाय परवाना नूतनीकरण, वाहनांच्या फिटनेस तपासणी प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचार, सुरक्षित पार्किंग स्टँडची उपलब्धता आणि चालकांना कामगार कायद्यांतर्गत मिळणारे हक्क या विषयांवरही विचारविनिमय केला जाणार आहे. शासनाला सर्वसमावेशक कायदेशीर निवेदन देण्याबरोबरच राज्यव्यापी महामोर्चा, धरणे आंदोलन आणि प्रशासकीय असहकार यांसारख्या आंदोलनांची दिशा निश्चित केली जाणार आहे.
डॉ. बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बैठकीस पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
‘अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन आपल्या हक्कांचे आणि व्यवसायाच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी सर्व रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. एकजुटीतूनच आपल्या मागण्यांना न्याय मिळवून देता येईल,’ असे आवाहन डॉ. बाबा कांबळे यांनी केले आहे.


















Join Our Whatsapp Group