वडेश्वरमध्ये ‘मायेची भाऊबीज’ सोहळ्याला माता-भगिनींची तुफान गर्दी
मावळ (Pclive7.com):- नातं प्रेमाचं, बंध मायेचा आणि सण भाऊबीजेचा… या भावनिक नात्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वडेश्वर येथे आयोजित ‘मायेची भाऊबीज’ सोहळ्यात माता-भगिनींना मदतीचा शब्द दिला. “माझ्या कोणत्याही बहिणीला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याला दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली, तर रुग्णालयात जाण्यापूर्वी मला एकदा संपर्क करा. उपचारांचा खर्च कमीत कमी कसा होईल, मोफत उपचार कसे मिळतील, यासाठी हा भाऊ पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल,” अशी भावनिक ग्वाही आमदार शेळके यांनी दिली. त्यांच्या या विधानाने उपस्थित माता-भगिनींमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

आंदर मावळमधील वडेश्वर येथे गुरुवारी (दि. १२) आयोजित या भाऊबीज सोहळ्याला माता-भगिनींनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वडेश्वर, वहानगाव, नागाथली, माऊ, गभालेवाडी आणि सटवाईवाडी परिसरातील महिलांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती. आमदार सुनील शेळके यांचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, आमदार शेळके यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या बैलगाडीचे सारथ्य एका महिला भगिनीने केले, तर इतर महिलांनीही बैलगाडीतून सहभागी होत उत्साहात मिरवणूक काढली. महिलांनी भाऊबीजेची गीते गात आमदार शेळके यांचे औक्षण केले आणि त्यांच्याविषयीचे प्रेम व विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले की, माझ्या राजकीय वाटचालीच्या सुरुवातीपासूनच माता-भगिनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे प्रेम आणि विश्वास हीच माझ्या कामाची खरी प्रेरणा आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहणे, ही माझी जबाबदारी आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा. उपचारांसाठी कमीत कमी खर्च कसा येईल, तसेच शक्य तेथे मोफत उपचार कसे मिळतील, यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मात्र, सर्वांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे, दवाखान्यात जाण्याची वेळच येऊ नये, अशी माझी मनापासून इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात आमदार शेळके यांनी विरोधकांनाही आपल्या खास शैलीत टोले लगावले. त्यामुळे भाऊबीजेच्या भावनिक वातावरणात राजकीय फटकेबाजीचीही रंगत पाहायला मिळाली. कार्यक्रमाला महिलांसह पुरुष नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती. यावेळी महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. श्री. विठ्ठलराव शिंदे, श्री. गणेश खांडगे, गणेश आप्पा ढोरे, साहेबराव कारके यांच्यासह विविध पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, परिसरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाऊबीजेच्या निमित्ताने दिलेली आरोग्यविषयक मदतीची ग्वाही आणि बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा दिलेला शब्द, यामुळे वडेश्वरमधील ‘मायेची भाऊबीज’ सोहळा केवळ सणापुरता मर्यादित न राहता माया, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा सोहळा ठरला.


















Join Our Whatsapp Group