पिंपरी (Pclive7.com):- पुणे शहरात रविवार, दि.१५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय एकता दौड’ (Run for Unity) आणि ‘Soldierathon’ या दोन प्रमुख मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी पुणे मेट्रो प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. धावपटू आणि नागरिकांच्या सोयीसाठी या दिवशी पुणे मेट्रोची सेवा पहाटे ३:४० वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
या विशेष व्यवस्थेमुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो धावपटूंना वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

सर्व मार्गांवर दर २० मिनिटांनी मेट्रो
रविवारी पहाटे ३:४० वाजता रामवाडी, वनाझ, पीसीएमसी आणि स्वारगेट या चार टर्मिनल स्थानकांवरून पहिली मेट्रो सुटणार आहे. पहाटे ३:४० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर दर २० मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल.
जिल्हा न्यायालय स्थानकातून दर १० मिनिटांनी अतिरिक्त फेऱ्या
धावपटूंची विशेष सोय लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्थानकातून पीसीएमसी आणि वनाझच्या दिशेने दर १० मिनिटांनी अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना वनाझ मार्गिकेने लोकमान्य टिळक चौक (अलका चौक) येथे पोहोचता येणार आहे. तर ‘Soldierathon’ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना पीसीएमसी मार्गिकेने संबंधित कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

अशी असेल विशेष मेट्रो सेवा :
- मार्गिका १ : पीसीएमसी ते स्वारगेट – दर २० मिनिटांनी.
- मार्गिका २ : वनाझ ते रामवाडी – दर २० मिनिटांनी.
- जिल्हा न्यायालय ते पीसीएमसी – दर १० मिनिटांनी अतिरिक्त सेवा.
- जिल्हा न्यायालय ते वनाझ – दर १० मिनिटांनी अतिरिक्त सेवा.
तसेच पीसीएमसी-स्वारगेट आणि वनाझ-रामवाडी या दोन्ही मार्गिकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावर मार्गिका बदलण्याची सुविधा उपलब्ध असेल.
पुणे मेट्रो प्रशासनाने सर्व धावपटू, नागरिक आणि क्रीडाप्रेमींना या विशेष मेट्रो सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित, जलद आणि विनाअडथळा प्रवासासाठी मेट्रोचा वापर करून वाहतूक कोंडी कमी करण्यास सहकार्य करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.


















Join Our Whatsapp Group