पुणे (Pclive7.com):- पुण्यातील प्रसिद्ध एफसी रोडवरील वैशाली आणि रूपाली या दोन्ही नामांकित रेस्टॉरंटवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. स्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळल्याने दोन्ही रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत हे धक्कादायक प्रकार समोर आले.

एफडीएच्या तपासणीदरम्यान वैशाली रेस्टॉरंटला ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. काही अन्नपदार्थ उघड्यावर ठेवण्यात आल्याचे, तसेच डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा स्वच्छतागृहाच्या शेजारी असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचे योग्य निकष पाळले जात नसल्याचेही स्पष्ट झाले.

दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटमध्येही अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवण्यात आले नव्हते. काही खाद्यपदार्थांवर वापरण्याची अंतिम तारीख नमूद नसल्याचे तपासणीत आढळले. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने एफडीएने दोन्ही रेस्टॉरंटवर परवाना निलंबनाची कारवाई केली.

दरम्यान, दोन्ही रेस्टॉरंटना आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून स्वच्छता व अन्नसुरक्षेचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. एफडीएकडून पुनर्तपासणी केल्यानंतर लेखी परवानगी मिळेपर्यंत या दोन्ही रेस्टॉरंटना अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी करता येणार नाही. पुण्यातील प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीचा भाग असलेल्या या दोन रेस्टॉरंटवरील कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

















Join Our Whatsapp Group