पिंपरी (Pclive7.com):- ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या प्रस्तावित चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द वगळून चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.

‘महाराष्ट्र’ हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्याय, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समतावादी विचार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मूल्यांची गौरवशाली परंपरा सांगणारे आहे. अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेच्या प्रतीक असलेल्या महाराष्ट्राचे नाव एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित विषयाला जोडणे योग्य नसल्याचे भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.

महिलांवरील लैंगिक अत्याचार, शोषण आणि समाजातील अनिष्ट प्रवृत्तींविरोधात जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. अशा गंभीर विषयांवर चित्रपटाच्या माध्यमातून समाजप्रबोधन होत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, अशा विषयाला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नाव जोडल्याने राज्याच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

साहित्य, नाटक आणि चित्रपट ही केवळ मनोरंजनाची माध्यमे नसून समाजमन घडविणारी आणि सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारी प्रभावी साधने आहेत. कलात्मक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर राखतानाच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा, सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आणि जनभावनांचाही सन्मान राखला गेला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी तसेच मराठी साहित्य व नाट्य क्षेत्रातील पदाधिकारी या नात्याने महाराष्ट्राच्या अस्मितेचे जतन करणे ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या प्रस्तावित चित्रपटाचे शीर्षक बदलून त्यातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द वगळण्यात यावा, अशी ठाम मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group