वाकड (Pclive7.com):- गर्दीचा फायदा घेत दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीसह दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, एकूण ६ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाकड येथील भूमकर चौकातील पु. ना. गाडगीळ (पी.एन.जी.) ज्वेलर्समध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही चोरी झाली होती. दुकानात गर्दी असताना आरोपींनी कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे २९.८४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास केले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच पद्धतीने १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पी.एन.जी. ज्वेलर्समध्ये गर्दीचा फायदा घेत १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ११.३७६ ग्रॅम वजनाचे शॉर्ट मंगळसूत्र चोरी करण्यात आले होते. याप्रकरणीही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, आरोपींचा ठोस मागमूस लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी भूमकर चौकातील पी.एन.जी. ज्वेलर्सपासून कोंढवा आणि केशवनगरपर्यंतच्या मार्गावरील सरकारी तसेच खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सलग पाहणी केली. या तपासातून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची ओळख पटवून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला.
पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे लक्षात येताच आरोपी दुसऱ्या राज्यात जाऊन लपून बसले होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्यांच्यावर नजर ठेवली. आरोपी महाराष्ट्रात परतताच सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत धनराज विजय परमार (वय ४८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) याला ११ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तपासात निष्पन्न झालेली महिला आरोपी सुचित्रा किशोर साळुंखे (वय ५५, रा. शिंदेवस्ती, केशवनगर, पुणे) हिला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, पोलीस उपनिरीक्षक मारणे तसेच पोलीस अंमलदार दळे, वंदू गिरे, मो. नदाफ, विजय मोरे, सचिन गायकवाड, दीपक साबळे, विजय घाडगे, विजय भुसारे, विक्रम भगत, कौस्तेय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, समाधान कांबळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.

















Join Our Whatsapp Group