पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील पाचपीर चौकाजवळ एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने मुलाच्या डाव्या हातावर वार करून त्याला जखमी केले. या घटनेनंतर दोघांनी हातातील कोयता हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काळेवाडीतील शंभर चाळ, पाचपीर चौकाजवळील ऑक्सिगर हॉस्पिटलसमोर घडली. फिर्यादी १६ वर्षीय मुलगा पायी जात असताना आरोपी वैभव देवीदास गणगोपाळ (वय १९) याने त्याला शिवीगाळ करून डावा हात पकडत मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला दोन्ही हातांनी पकडून ठेवले.

याचवेळी दुसरा आरोपी गौरव चंद्रकांत साळवे (वय १९) याने कमरेला लावलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डाव्या हातावर वार केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कोयता हवेत फिरवत, “कोणीही मध्ये येणार नाही, कोणी मध्ये आल्यास त्याला सोडणार नाही,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव गणगोपाळ याला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा सहभाग तपासला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.



















Join Our Whatsapp Group