पिंपरी (Pclive7.com):- महागाईने आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक परिसरात सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.२५ रुपयांची वाढ झाल्याने नवीन दर ९९ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. त्यामुळे सीएनजीने आता शंभरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे.

घरगुती पीएनजी गॅसच्या दरातही प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर १.५० रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता ग्राहकांना पीएनजीसाठी ५३ रुपये मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे घरगुती ग्राहकांसह वाहनचालकांनाही आर्थिक फटका बसणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अनेक वाहनचालकांनी सीएनजी वाहनांना पसंती दिली होती. मात्र, आता सीएनजीचे दरही सातत्याने वाढत असल्याने वाहनचालकांची चिंता वाढली आहे. सीएनजीचे दर पेट्रोलच्या जवळपास पोहोचत असल्याने रिक्षाचालक, खासगी वाहनधारक आणि व्यावसायिक वाहनचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

आधीच वाढलेला घरखर्च, महागाई आणि दैनंदिन खर्चाचा ताण सहन करणाऱ्या नागरिकांना पीएनजी दरवाढीचाही फटका बसणार आहे. इंधन दरवाढीमुळे प्रवास खर्च वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
एकीकडे महागाई नियंत्रणात आणण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे इंधन दरवाढीचा भडका उडत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, दरवाढीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


















Join Our Whatsapp Group