निगडी (Pclive7.com):- शिवसेना नेत्या नगरसेविका सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे यांनी माता अमृतानंदमयी (अम्मा) यांची सदिच्छा भेट घेतली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या स्नेहभेटीत अम्मांनी सुलभाताईंच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्याचे विशेष कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले.

यमुनानगर, निगडी येथील शाळा आणि महाविद्यालयाच्या उभारणीसाठी सुलभाताईंनी केलेले अथक प्रयत्न आणि प्राधिकरणाकडून शैक्षणिक संस्थेसाठी जागा उपलब्ध करून देताना घेतलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांची अम्मांनी आवर्जून आठवण काढली. त्या काळात ताईंनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अम्मांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

सुलभाताई नगरसेविका झाल्याबद्दल अम्मांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच यमुनानगर, निगडी परिसराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास घडवून आणण्यात सुलभाताईंनी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. परिसराच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची अम्मांनी प्रशंसा केली.

यावेळी यमुनानगरसारख्या नियोजनबद्ध परिसराच्या भविष्यातील विकासाबाबत अम्मांनी काही मोलाच्या सूचना आणि मार्गदर्शन केले. परिसराचा सर्वांगीण विकास साधताना नागरिकांच्या गरजा, सार्वजनिक सुविधा आणि भविष्यातील नियोजन यांना प्राधान्य देण्याबाबत त्यांनी सकारात्मक विचार मांडले.

यापुढेही भोसरी विधानसभा मतदारसंघासह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सुलभाताईंना बळ, ऊर्जा आणि यश लाभो, असे आशीर्वाद अम्मांनी दिले. तसेच प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी कोणतीही अडचण किंवा मदतीची आवश्यकता भासल्यास आपले शुभ आशीर्वाद आणि पाठबळ सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
जुन्या आठवणी, सामाजिक कार्याची पोचपावती, यमुनानगरच्या विकासाचे कौतुक आणि भविष्यातील वाटचालीसाठी मिळालेले आशीर्वाद अशा भावपूर्ण वातावरणात ही स्नेहभेट पार पडली. अम्मांनी केलेले कौतुक आणि दिलेले आशीर्वाद सुलभाताईंच्या पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहेत.


















Join Our Whatsapp Group