भोसरी (Pclive7.com):- २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भोसरी विधानसभा मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे अचानक मतदार यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, भोसरीतील स्थानिक मतदारांची नावे त्यांच्या मूळ मतदारसंघातून वगळली जाऊन थेट छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि अंबरनाथ यांसारख्या दूरच्या शहरांतील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप बाधित मतदारांनी केला आहे.

या प्रकारामुळे अनेक नागरिकांना निवडणुकीत मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहावे लागल्याची भावना व्यक्त होत आहे. आपले नाव वर्षानुवर्षे भोसरीच्या मतदार यादीत असताना अचानक ते दुसऱ्या शहरातील यादीत कसे गेले? ही नावे कोणत्या प्रक्रियेद्वारे स्थलांतरित करण्यात आली? यामागे नेमकी चूक कोणाची? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकाचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे. मात्र, मतदारांची नावे अशा प्रकारे एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्याचा प्रकार घडत असेल, तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

एका बाजूला निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी आणि मतदानाबाबत जनजागृती केली जाते, तर दुसऱ्या बाजूला हजारो मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून भोसरीतील मतदारांची नावे नेमकी कोणत्या कारणाने आणि कोणाच्या माध्यमातून इतर शहरांच्या मतदार यादीत समाविष्ट झाली, याचा खुलासा करावा. तसेच दोषींवर कारवाई करून बाधित मतदारांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


















Join Our Whatsapp Group