भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये पायी भ्रमंती करणाऱ्या योग अभ्यासकाचा मोशीत सत्कार
पिंपरी (Pclive7.com):- भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये सुमारे २३ हजार किलोमीटरचा पायी प्रवास करणारे म्हैसूरचे ३० वर्षीय योग अभ्यासक कृष्णा नाईक यांनी शनिवारी मोशीतील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला भेट दिली. यावेळी त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे पूजन करून महाराजांच्या चरणी नमन केले. मोशीतील तपोवन भूमीत श्री नागेश्वर महाराजांच्या नंदादीपाचेही त्यांनी दर्शन घेतले.

या भेटीदरम्यान आमदार महेश लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी नाईक यांच्याशी त्यांच्या पदयात्रेतील अनुभव आणि पुढील योजनांबाबत संवाद साधला. “या प्रवासात अनेक चढ-उतार आले. प्रत्येक आव्हानातून नवा मार्ग शोधण्याची सवय लागली,” असे नाईक यांनी सांगितले.

प्रवासात भेटलेली माणसे, वेगवेगळ्या प्रदेशांत आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेली शिकवण पुस्तकातून मांडण्याचा नाईक यांचा मानस आहे. पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर या प्रवासावरील माहितीपट प्रदर्शित करण्याचीही त्यांची योजना आहे. यासोबतच योग विषयात पीएच.डी. करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मोशी सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह युवा उद्योजक नितीन घिगे, चेअरमन राहुल सस्ते, गणेश गुरव, सचिन वहिले, विशाल टेकाळे, तुषार सस्ते, दत्तात्रय सस्ते आणि स्वप्नील भुमकर आदींच्या हस्ते नाईक यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

“या पदयात्रेत अनेक चढ-उतार आले. प्रत्येक आव्हानातून नवा मार्ग शोधायला शिकलो. वाटेत भेटलेली माणसं आणि त्यांच्याकडून मिळालेली शिकवण मला पुस्तकातून मांडायची आहे. यात्रा पूर्ण झाल्यावर या प्रवासावरचा माहितीपटही प्रेक्षकांसमोर आणण्याचा मानस आहे. मोशीतील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. मोशीकरांनी केलेल्या सत्काराने पुढची वाट चालण्यासाठी नवं बळ मिळालं.”
– कृष्णा नाईक, योग अभ्यासक, म्हैसूर.


















Join Our Whatsapp Group