शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कार्याला नवी दिशा; कार्यकर्त्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज कार्यालय
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून त्याला अत्याधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. मोरवाडी येथील एम.एस.आर. कॅपिटलमध्ये उभारण्यात आलेल्या या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून नव्या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या कार्यालयामुळे शहर भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळणार असून कार्यकर्त्यांना कामासाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न ‘बापू’ काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यालयात आधुनिक सुविधांची रेलचेल..
गेल्या काही काळात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा वाढलेला व्याप आणि कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षात घेऊन मोरवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे आकर्षक व आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. या नव्या वास्तूमध्ये प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, डिजिटल मीडिया कक्ष, पदाधिकाऱ्यांसाठी आधुनिक केबिन, ग्रंथालय तसेच पक्षविस्तार आणि संघटनात्मक कामकाजासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सुविधांमुळे पक्षाच्या बैठका, संघटनात्मक नियोजन, आगामी कार्यक्रमांची आखणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणूनही हे कार्यालय कार्यरत राहणार आहे.

‘कार्यालय हे जनसेवेचे व्यासपीठ ठरेल’ – शत्रुघ्न काटे
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न ‘बापू’ काटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या शुभहस्ते दिमाखात उद्घाटन होणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. कार्यकर्त्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि तळागाळातील सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी प्रभावीपणे सोडविता याव्यात, यासाठी हे कार्यालय आधुनिक आणि सुसज्ज करण्यात आले आहे. हे कार्यालय केवळ विटा-सिमेंटची वास्तू नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या ऊर्जेचे आणि जनसेवेचे व्यासपीठ असेल. प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण मिळून पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा भगवा अधिक ताकदीने फडकवू.”
भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती..
या उद्घाटन सोहळ्यास भाजपचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडये, विकास डोळस, संजय पटणी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, सदाशिवराव खाडे, उपमहापौर शर्मिला बाबर, सुजाताताई पालांडे, राजू दुर्गे, अनुप मोरे, राजेश आण्णा पिल्ले, दिनेश यादव यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, विविध प्रकोष्ठांचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतनीकरण झालेल्या या भव्य आणि आधुनिक कार्यालयामुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असून पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी हे कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याची भावना यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

















Join Our Whatsapp Group